कार्यवाही न झाल्यास शिवदूत डॉ. श्रीकांत चेमटे यांचा आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी : करोना महामारी काळा पासून बंद करण्यात आलेल्या पाथर्डी -बालमटाकळी, पाथर्डी -चकलंबा, पाथर्डी - गेवराई, पाथर्डी -तोंडोळी या कोरडगाव मार्गे धावणाऱ्या एसटी बस तातडीने सुरू कराव्यात अशी मागणी शिवसेना उबाठाचे शिवदूत तथा शिव आरोग्य सेना जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत चेमटे यांनी पाथर्डी आगार व्यवस्थापकांना लेखी निवेदन देत केली आहे.
डॉ. चेमटे यांनी म्हटले आहे की,
या मार्गांवर अनेक शाळा, हायस्कूल, कॉलेज असून कारखाना देखील आहे. तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर पाथर्डी या ठिकाणी दवाखान्यात व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येत असतात. तसेच पाथर्डी या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या एसटी बसच्या माध्यमातून जेवणाचे डबे येत असतात.
परंतु या मार्गावर एसटी बस धावत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली आहे. तसेच अनेक शेतकरी आपला भाजीपाला पाथर्डी या ठिकाणी विकण्यासाठी घेऊन येतात. तसेच कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील एसटी बस सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय निर्माण झाली असल्याचे निवेदनात चेमटे यांनी म्हटले आहे.
एसटी आगार व्यवस्थापक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी लवकरात लवकर बस सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा डॉ. श्रीकांत चेमटे यांनी दिला आहे.
0 Comments