राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महाराष्ट्रातील बुरुज ढासळणार... भाजप पुन्हा एकदा राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत
तुतारीचे आमदार फुटणार ?
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतरही शिवसेना उबाठा पक्षातून अनेक नेत्यांना शिंदेसेना गळाला लावत आहे. त्यातच आता दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांची अमित शहां बरोबर भेट झाल्याची बातमी समोर आली आहे.
याची अधिकृत पुष्टी जरी पाटील यांनी केली नसती तरी देखील पडद्याआड अनेक घडामोडी सुरू आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून पाटील यांच्या कार्यक्रमांना त्यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे.
यामुळे येत्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असून जयंत पाटील हे जर भाजपमध्ये दाखल झाले तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा बुरुज ढासळेल. या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता आहे.
जयंत पाटील हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांना जवळपास सर्वच नेते सोडून अजित पवार यांच्या समवेत पक्षातून बाहेर पडल्यानंतर पवार यांच्याकडे राहिलेले एक मात्र मोठे नेते म्हणून पाटील यांच्याकडे पाहिले जाते.
त्यानंतर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि जितेंद्र आव्हाड हे तीनच नेते असे आहेत की ज्यांची राज्य पातळीवर प्रतिमा आहे.
जयंत पाटील यांच्याकडे लोकसभा, विधानसभा निवडणूक काळामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. आजही ती कायम आहे.
जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्यामध्ये मोठा संघर्ष असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. रोहित पवार हे अनेक वेळा पाटील यांच्यावर जाहीररित्या निशाणा साधताना दिसले आहेत. यावर्षीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या अहिल्यानगर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये रोहित पवार यांनी पाटील यांना लक्ष केले होते. पाटील यांनी देखील पलटवार करत रोहित पवार यांना उत्तर दिले होते. जयंत पाटील यांना हटवून रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे की काय अशा चर्चा यामुळे अनेक वेळा घडल्या आहेत. पाटील, रोहित पवार यांच्यातील हे शीतयुद्ध बोलके असून यामुळे जयंत पाटील अस्वस्थ असल्याचे बोलले जाते.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकीट वाटपामध्ये जयंत पाटील यांनी आपल्याला मानणाऱ्या अनेक उमेदवारांना तिकीट देण्यासाठी आग्रह धरल्याचे बोलले जाते. त्यांचा आग्रह शरद पवार यांनी मान्य देखील केल्याचे दिसते आहे. कारण राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या निवडीमध्ये जयंत पाटलांची पसंती असणारे अनेक उमेदवार हे तिकीट घेत रिंगणात उतरले होते. मात्र यातील बहुतांशी उमेदवार हे पराभूत झाले. पक्षांतर्गत लॉबिंग करण्यामध्ये पाटील हे यशस्वी झाले. मात्र निवडणुकीच्या रणांगणात त्यांनी दिलेल्या उमेदवारांना यश गाठता आल नाही.
शरद पवारांच्या तुतारीचे ८६ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. यापैकी केवळ दहाच आमदार निवडून येऊ शकले. लोकसभेला १० उमेदवार देऊन ८ खासदार निवडून आणणाऱ्या पवारांना हा मोठा धक्का मानला गेला. त्यातच आता जर शरद पवारांच्या तुतारीचे आमदार फुटणार असतील तर त्यांना दोन तृतीअंश आमदारांची संख्या लागेल, म्हणजे सुमारे ७ आमदारांचा गट जर शरद पवारांपासून वेगळा झाला तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्यातून सुटका मिळेल.
जयंत पाटील यांच्याशी सख्य आणि जवळीक असणाऱ्या आमदारांची संख्या ही मोठी आहे. ही संख्या सात होण्याकरिता पडद्याआड घडामोडी सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसे प्रत्यक्ष झाल्यास सात किंवा त्यापेक्षा अधिक आमदारांना घेऊन जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी राजकीय अटकळ बांधली जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातील एक कॅबिनेट मंत्रीपद अद्यापही रिकामी आहे. जयंत पाटील यांना गळाला लावण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून भाजप करत आहे हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळेच जयंत पाटील हे आमदारांचा एक गट घेऊन भाजपमध्ये दाखल झाल्यास त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागू शकते. त्यांच्या समवेत फुटणाऱ्या आमदारांना देखील महामंडळाच्या माध्यमातून संधी दिली जाऊ शकते. तर मतदारसंघातील विकास कामांसाठी भरघोस निधी देखील दिला जाऊ शकतो.
0 Comments