अत्याधुनिक एलिव्हेटेड तीन मजली उड्डाणपुलाच्या कामाला मार्चपासून सुरुवात
अहिल्यानगर : अहिल्यानगर ते पुणे हा प्रवास अत्यंत रहदारीचा झाल्यामुळे अनेक वेळा तीन ते चार तासांहून अधिक वेळ प्रवासांना लागतो. पण आता या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशां साठी खुशखबर आहे. लवकरच खराडी ते शिरूर या पहिल्या टप्प्यातील मार्गावर वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता तीन मजली उड्डाणपूल होणार आहे. त्याचे काम मार्च अखेरीस सुरू होणार आहे. तशी माहिती शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आ. माऊली कटके यांनी दिली आहे.
या पाच ठिकाणी उड्डाणपुलाला बाह्य मार्ग
या मार्गावर अनेक मोठी गावे आहेत. त्यामुळे या गावांमधून पास होत असताना मोठ्या वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. मोठ्या काळासाठी रांगेत उभे राहावे लागते. मात्र या मार्गावरील शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, लोणीकंद आणि खराडी या पाच रहदारीच्या ठिकाणी उड्डाणपुलाला बाह्यमार्ग निर्माण केला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खराडी बायपास ते शिरूर या मार्गाचे काम होणार आहे. अत्याधुनिक पद्धतीने एलिव्हेटेड उड्डाणपूलाच्या या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील हा पहिला अत्याधुनिक एलिव्हेटेड उड्डाणपूल होणार असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प कार्यालयाच्या वतीने तो तयार केला जाणार आहे.
राज्य शासनाकडे याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला असून या कामाकरिता भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला ठरवून देण्याबाबत या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. लवकरात लवकर या प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शवली आहे.
अहिल्यानगर वासियांचा त्रास कमी होणार
अहिल्यानगर तसेच छत्रपती संभाजी नगर वरून दररोज पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. छत्रपती संभाजी नगर ते अहिल्यानगर हे अंतर लवकर कापले जाते. मात्र शिरूरच्या पुढे गेल्यानंतर पुण्यापर्यंत मात्र प्रवास अत्यंत रेंगाळत होतो. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अहिल्यानगर वासियां सह छत्रपती संभाजी नगरच्या नागरिकांचा देखील फायदा होणार आहे.
0 Comments