आर - पार !! संपादकीय !! नगर समाचार 18 न्यूज
तात्याराव नगरकर यांच्या रोखठोक लेखणीतून
संपादकीय : छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारल तरी शिवभक्तांचा उर भरून येतो. रक्त सळसळत. नुकतीच महाराजांची जयंती साजरी झाली. महाराष्ट्रच नव्हे तर जगभरात ती साजरी केली गेली. वारसाने नव्हे तर स्वकर्तुत्वाने राजे झालेले छ. शिवाजी महाराज जगाच्या पाठीवरील एकमेव राजे आहेत. अशा आपल्या लाडक्या राजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत ७०० शार्प शूटर्सची भारतभर गॅंग असणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फोटो नाचविले गेले. अन्याय, अत्याचारा विरुद्ध लढलेल्या महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये अन्याय, अत्याचाराची परिसिमा गाठणाऱ्या गँगस्टरच्या प्रतिमेचे लांगुन - चालन, उदत्तीकरण केल गेल. यातून नेमका कोणता समाज अहिल्यानगर शहरामध्ये घडविण्याचे काम राजकीय नेते करत आहेत ? आपल्या महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील सर्व वाईन, बियर शॉपी, परमिट रूम बंद असताना देखील दारूचा महापूर मिरवणुकीमध्ये नाचणाऱ्यांच्या घशातून खाली कसा काय उतरविला जातो ? एक्साईज डिपार्टमेंट काय करीत होते ? पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा किळसवाणा प्रकार कसा काय सुरू होता ?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जिल्ह्याचे एसपी राकेश ओला साहेब अहिल्यानगरकर तुम्हाला मागत आहेत. एसपी साहेब, अहिल्यानगर शहरामध्ये आता घराघरात गॅंगस्टर बिश्नोई तयार होण्याची वाट पाहायची काय ? ७०० शार्प शूटर्सची गॅंग चालविणाऱ्याच्या विचारधारेवर अहिल्यानगरात तयार होणाऱ्या गँग एक दिवस दिवसाढवळ्या नगरकरांच्या नरडीचे घोट घेतील. रक्तपात करतील. उद्योजक, व्यापारी, सर्वसामान्य नगरकरांना वेठीस धरतील. गुन्हेगारी फोफावेल. एसपी साहेब, तुम्हीच सांगा कोणता 'आदर्श समाज' यातून राजकीय, प्रशासकीय व्यवस्था घडवू पाहत आहे ? एसपी साहेब, तुम्हाला हे वेळीच रोखावे लागेल. अन्यथा महाराज आपणा सर्वांनाच कधीच माफ करणार नाहीत. महाराज आम्हाला माफ करा ! आम्ही नाक रगडून माफी मागितली, प्रयागराजला जात आंघोळ केली तरी देखील आमचं हे पाप या जन्मी तरि कधीच धुवून निघणार नाही. महाराज आम्ही चुकलोच.
महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, गाव, खेड्यात, वाडी वस्तीवर शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्याची, साजरी करण्याची परंपरा आहे. या मिरवणुकांमधून समाजाला, तरुण पिढीला प्रेरणा, दिशा मिळत असते. मात्र अहिल्यानगर शहरात यावर्षीच्या शिवजयंतीत जे काही घडल ते मन सुन्न करणार आहे. महाराजांच्या जयंतीच्या नावाने काढलेल्या मिरवणुकीत रात्रीच्या काळया अंधारात तरुणाई दारूच्या नशेत, डीजेच्या दणदणाटात बेफाम होऊन नाचली.
याच शहरामध्ये खरी शिवजयंती साजरी झाली ती सकाळी. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विविध शाळा, कॉलेजच्या निघालेल्या मिरवणुकीतून. विद्यार्थी, तरुणांनी अत्यंत सुंदर, बोलके, जिवंत देखावे मिरवणूक मार्गावरील चौका चौकात सादर केले.
पण काही तासां नंतर याच मिरवणूक मार्गावर देशामध्ये दहशत माजविणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला डोक्यावर घेऊन नाचविले गेले. बहुसंख्य तरुणांना तर याबद्दल मिरवणूक सुरू असताना माहिती देखील नव्हती. गर्दीत त्यांच्या हातामध्ये ही पोस्टर्स राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आणून सोपवली खरी. पण आपण कुणाचं पोस्टर घेऊन नाचतोय याच भान देखील तरुणाईला नव्हतं.
अनेकांना लॉरेन्स बिश्नोई माहीती असला तरी असाही एक मोठा वर्ग आहे की त्यांना बिश्नोई माहीत नाही. बिश्नोईवर मर्डर, हाफ मर्डर, खंडणी, दरोडे, शोषण असे असंख्य गुन्हे दाखल आहेत. त्याचे देशभरामध्ये ७०० पेक्षा जास्त शार्प शूटर्स आहेत. तो गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात आहे. तुरुंगातूनच तो त्याचे गुन्हेगारी जगत ऑपरेट करतो. त्याच्या गुन्हेगारीचा विस्तार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पण झाला आहे. देशातील काही हाय प्रोफाईल मर्डर केस त्याच्या नावावर आहेत. त्याच नाव घेतल तरी अनेकांना धडकी भरते. एवढा त्याचा गुन्हेगारी जगतामध्ये दरारा आहे.
प्रश्न पडतो तो अशा दहशत माजविणाऱ्या गँगस्टरच्या पोस्टर्सना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत का झळकवल गेल ? या मागचा नेमका हेतू काय आहे ? अहिल्यानगरच्या शिवजयंती मिरवणुकीमध्ये पाच मंडळ सहभागी झाली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने जर कोणी आपल्या राजांचा जन्मोत्सव साजरा करत असेल तर त्यांच कौतुकच केलं पाहिजे.
पण मिरवणुकीत वेगळाच राजकीय अजेंडा राबविल्याच पाहायला मिळालं. त्यावरून काहींनी वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. मिरवणुकीत सहभागी झालेली पाचही मंडळ हे शहराच्या आ. संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांची होती. जसे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर कार्यकर्त्यांच्या हातात झळकत होते तसेच पोस्टर संग्राम जगताप यांचे पण त्याच कार्यकर्त्यां कडून झळकवले जात होते.
अहिल्या नगरकरांसाठी आता हे नवीन राहिलेल नाही की, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय हल्ला प्रकरण, केडगाव दुहेरी हत्याकांड यामुळे जगताप आणि त्यांचे समर्थक यांची नावं कायमच चर्चेत असतं. यावरून जगतापांना तुरुंगवारी देखील करावी लागली आहे.
जगताप यांच्यावर त्यांचे राजकीय विरोधक सातत्याने गुंडगिरी, दहशत, ताबेमारीचा आरोप करत असतात. त्याच आ.जगताप यांच्या समर्थकांनी काढलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत गँगस्टरच प्रमोशन का केलं गेलं ? हा आत्मपरीक्षण करायला लावणारा विषय आहे.
कुख्यात गुंड गजा मारणे याची मिरवणूक काढण्याच्या कारणावरून पोलिसांनी मिरवणूक काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यातून एक चांगला संदेश तरुण पिढीला दिला. मात्र अहिल्यानगरच्या एसपी साहेबांनी नगरमध्ये घडलेल्या या भयानक प्रकाराबद्दल अजून कारवाईची ठोस भूमिका का घेतली नाही ? त्यांच्यावर कोणाचा राजकीय दबाव आहे का ?
या मिरवणुकीत खरंतर ज्या महात्मा फुले यांनी रायगडावरील महाराजांच्या समाधीचा शोध लावला, महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला त्यांचा, ज्यांनी घराघरात शिवजयंती, गणेशोत्सव जाण्यासाठी दिशा दिली त्या लोकमान्य टिळक, त्याचबरोबर घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती राजश्री शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले अशा समाजाला दिशा देणाऱ्या या महान व्यक्तिमत्वांचे पोस्टर्स झळकवायला हवे होते. मात्र त्यांची जागा गँगस्टरनी घेतलेली पाहायला मिळाली.
याला खरंच शिवजयंती म्हणायची की गँगस्टरर्सची दहशत प्रस्थापित करणारी मिरवणूक ?
मिरवणुकीकडे पाहिलं तर याला खरोखर शिवजयंती म्हणायची का ? यातून शहराच्या तरुण पिढीला राजकीय नेतृत्वाला नेमका काय आदर्श, संदेश द्यायचा आहे ? हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांना गँगस्टरच उदत्तीकरण करण म्हणजे हिंदुत्व असं समाज मनावर बिंबवायच आहे का ? की यातून गँगस्टरची दहशत प्रस्थापित करण्याचा अजेंडा मिरवणुकीच्या नावाखाली राबविला जात आहे ? याचा विचार समाज मनाने करण्याची गरज आहे.
आ. जगतापांच हिंदुत्व आता गँगस्टर्स तयार करण्याची फॅक्टरी होणार काय ?
त्यांच्या पहिल्या दोन्ही विजयांमध्ये त्यांना मुस्लिम मतदारांचा एकतर्फी पाठिंबा होता. हे जग जाहीर आहे. मात्र त्याच जगताप यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत, विशेषत: निकालानंतर अचानकपणे आपण प्रखर हिंदुत्ववादी आहोत असा अजेंडा राबवायला सुरुवात केली.
मात्र हिंदुत्वाच्या नावाने काम करणाऱ्या जगतापांच्या पाठबळाने जर अहिल्यानगर मध्ये गँगस्टरचं उदात्तीकरण होणार असेल तर आ. जगतापांच हिंदुत्व आता गँगस्टर्स तयार करण्याची फॅक्टरी होणार काय ? हा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.
पोलीस लोकप्रतिनिधीं समोर हतबल झाले आहेत काय ?
कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं कामच आहे. कोणत्याही मिरवणुका असल्या की या सगळ्याचा ताण हा पोलीस यंत्रणेवर असतो. ज्यावेळी मोठा मॉब मिरवणुकांमध्ये सहभागी होतो त्यावेळी पोलिसांना कौशल्याने परिस्थिती हाताळावी लागते. यंदाच्या शिवजयंती मिरवणुकीत हा सगळा नंगानाच सुरू असताना पोलिसांना हातबलपणे तो पहावा लागत होता. हे दुर्दैव. जिथं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया वरतीच राजकीय वरदहस्थातून हल्ला होतो, त्यामुळे पोलीस दलाच मनोबलाच खच्चीकरण केलं जातं, तिथे पोलीस आता अशा लोकप्रतिनिधी समोर हतबल झाले आहेत की काय ? हा प्रश्न आहे. मात्र ही हतबलता समाजाचा स्तर खाली आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. पोलिसांनी वेळीच योग्य ती कठोर भूमिका घेणे समाजाची गरज आहे. अन्यथा काळ सोकल्या शिवाय राहणार नाही.
मिरवणुकीपूर्वी तडीपार असणाऱ्या गुन्हेगाराला अटक, तर मिरवणुकीतच प्राण घातक हल्ला
मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी त्याच जवळच्या परिसरातून एक तडीपार असणारा गुंड पोलिसांनी ताब्यात घेतला. हा गुंड शहरातील एका राजकीय बड्या नेत्या बरोबर उजळ माथ्याने वावरत होता. तरी देखील पोलिसांनी धाडसाने ही कारवाई केली. त्यासाठी पोलिसांचे कौतुक केले पाहिजे.
मिरवणूक सुरू होण्यापूर्वी कोणाच्या मंडळाचा पुढे नंबर पाहिजे याच्यावरून आ. संग्राम जगताप यांचेच कार्यकर्ते असणारे स्थायी समितीचे माजी सभापती कुमार वाकळे आणि माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तो थांबवला. याच मिरवणुकीत दोन हिंदू युवकांवर चार-पाच हिंदू युवकांच्या टोळक्याने मिरवणूक सुरू असताना जुन्या वादातून प्राणघातक हल्ला केला. बरे झाले थोडक्यात निभावले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
कोणते आमदार खरे ?
सध्या बॉक्स ऑफिसवर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर निर्मित छावा चित्रपट पाहण्यासाठी तुडुंब गर्दी होत आहे. सर्वत्र या सिनेमाचे कौतुक होत आहे. अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी या सिनेमाची काही मोफत तिकीटं आ. संग्राम जगताप यांनी वाटली. ही कौतुकास्पद बाब आहे.
पण दुसरीकडे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं प्रमोशन करणाऱ्या समर्थकांना पाठबळ देणारे देखील आमदार जगतापच आहेत. त्यामुळे यातले खरे जगताप कोणते ? आमदारांचा खरा चेहरा कोणता ? की केवळ राजकारणासाठी सगळ्यांनाच एकाच वेळी चूचकारणं सुरू आहे ? याबद्दल आता शहरात चर्चा सुरू झाली आहे.
शेवटी, महापुरुषांच्या मिरवणुका, जयंत्या, पुण्यतिथी साजऱ्या झाल्याच पाहिजेत. त्यात समाजाचा, विशेषत: युवा पिढीचा सहभाग देखील हा मोठा असला पाहिजे. मात्र त्यासाठी अशा पद्धतीने आयोजन करायचे की समाजाला दिशा मिळेल अशा विचारवंतांच्या व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे याचा विचार होणे गरजेचे आहे. अन्यथा येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. एसटी राकेश ओला यांनी आत्तापर्यंतच्या त्यांच्या जिल्ह्याच्या कारकिर्दीच्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीने काम केल्याचे पाहायला मिळाले आहे. या प्रकरणी देखील ते योग्य ती कायदेशीर भूमिका घेतील अशी अहिल्यानगरवासियांना अपेक्षा आहे.
तूर्तास, मी तात्याराव नगरकर रजा घेतो.
1 Comments
वास्तव
ReplyDelete