भानुदास कोतकर यांना दणका.. अमोल येवले यांच्या तक्रारीवरून मोठी कारवाई
आ.जगतापांचे पाठबळ?
अहिल्यानगर : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीला भानुदास कोतकर यांचे नाव देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकी पूर्वी जंगी कार्यक्रम करत हा सोहळा पार पडला होता. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार अरुण जगताप यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होती.
मात्र या नामकरणाच्या सोहळ्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल येवले यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे लेखी तक्रार करत आक्षेप घेतला होता. त्यावर उपनिबंधक गणेश पुरी यांनी कारवाई करत आदेश काढला असून कोतकर यांच्या नावाचा फलक काढून घेण्याचे लेखी आदेश बाजार समितीला दिले आहेत. यामुळे कोतकर यांना ह्या मोठा दणका असल्याचे मानले जात आहे.
बहुचर्चित अशोक लांडे खून प्रकरणात सध्या शिक्षा भोगत असणाऱ्या भानुदास कोतकर यांचे नाव बाजार समितीच्या नेप्ती येथील उपबाजाराला देण्यात आले होते. राजकीय, सामाजिक नेते, कार्यकर्त्यांची नावे देण्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्र मध्ये पूर्वी होती. मात्र 1987 साली पणन संचालकांनी याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आदेश जारी करत अशाप्रकारे नावे देता येणार नाहीत असे परिपत्रक काढले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी हा दणका कोतकर यांना दिला आहे.
बाजार समितीने झटकले हात
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला उत्तर देताना पाठविलेला पत्रात म्हटले आहे की सदर नामकरण सोहळा हा बाजार समिती कार्यालयाने केलेला नसून या कार्यक्रमाचा खर्च देखील आम्ही केलेल्या नाही असे म्हणत सपशेल हात झटकले आहेत. त्यामुळे बाजार समितीचा नामकरण प्रकरणाशी संबंध नसेल तर मग बाजार समितीच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या उपबाजार समितीमध्ये हा नामकरण सोहळा बेकायदेशीर रित्या होत असताना बाजार समितीने त्याबाबत जसे आता जिल्हा उपनिबंधकांना पत्र लिहून कळविले तसे त्यावेळी का कळविले नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
बाजार समितीवर कोतकर, कर्डिले गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे जरी बाजार समितीने हा झटकले असते तरी देखील नामकरणाचे प्रकरण अंगलट आल्यामुळेच अशी यु टर्नची भूमिका बाजार समितीने घेतल्याचे बोलले जात आहे.
पारंपरिक विरोधक येवले राजकीय कुरघोडी करण्यात यशस्वी... पडद्याडून संग्राम जगतापांचे बळ ?
शिवसेनेचे अमोल येवले हे कोतकर यांचे पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. केडगावच्या स्थानिक राजकारणामध्ये त्यांची सतत विरोधाची भूमिका असते. त्यातच येवले यांच्या तक्रारीवरून ही मोठी कारवाई झाल्यामुळे कोतकरांवर राजकीय कुरघोडी करण्यात येवले यशस्वी झाले आहेत.
विधानसभा निवडणुकी आधी येवले हे आमदार संग्राम जगताप यांच्या गोटात सामील झाल्याचे पाहायला मिळाले. जगताप आणि कोतकर यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीपासून राजकीय वैर निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे येवले यांची तक्रार असली तरी देखील त्यांना पडद्या आडून जगताप यांचे या कुरघोडीसाठी पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.
0 Comments