Subscribe Us

Header Ads

शिर्डी संस्थान मध्ये मोठा भ्रष्टाचार ? पहा काय घडले...

 

शिर्डी संस्थान मध्ये मोठा भ्रष्टाचार ? 

अहिल्यानगर : साईबाबांची नगरी असणारे शिर्डी हे जगप्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. जगभरातील भाविक या ठिकाणी येत असतात. भारताच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी कोट्यावधी भाविक दर्शनासाठी शिर्डीत येतात. भाविकांसाठी शिर्डी संस्थान प्रशासनाच्या वतीने प्रसादलयाच्या माध्यमातून भोजन पुरविले जाते. 

गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प दरात भोजन दिले जायचे. मात्र अलीकडील काळात संस्थानाने प्रसादालयाच्या भोजनासाठी मोफत पास योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पूर्वीपेक्षा दररोज सुमारे दहा हजार जेवणाच्या थाळ्यांची संख्या कमी झाल्याचे समोर आले आहे. अचानक एवढी मोठी घट कशी काय झाली असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे. 

कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी यावरून प्रतिदिन दहा हजार थाळ्यांचा भ्रष्टाचार शिर्डी संस्थान प्रशासनाच्या वतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

जर त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळून आले तर प्रतिदिन दहा हजार थाळ्या म्हणजे वर्षातून सुमारे ३६ लाख थाळ्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर येऊ शकते. यासाठी येणारा खर्च हा शेकडो कोटींचा असून यामध्ये कोणा कोणाचा सहभाग आहे हे देखील चौकशीतून समोर येऊ शकते. मात्र याबाबत चौकशी होणार की नाही हे पहावे लागणार आहे.


शिर्डी सध्या अनेक कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी शिर्डी हे भिकाऱ्यांचे केंद्र झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे मोठे वादंग उभे राहिले होते. नुकतेच शिर्डीत झालेले हत्याकांड यामुळे शिर्डी गावच्या ग्रामस्थांनी अवैध धंद्यांच्या विरोधात जाहीर ग्रामसभा घेत पोलीस प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले होते.

या प्रकारांमुळे शिर्डीची प्रतिमा मात्र मलीन होत आहे. शिर्डी हे जगप्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्यामुळे अशा घडणाऱ्या घटनांमुळे भाविकांमध्ये चुकीचा संदेश जाऊन भविष्यात त्याचे दूरगामी नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

शिर्डी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता नसल्याकारणाने यापूर्वी देखील अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. मात्र आजपर्यंत आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण हे नगण्य आहे. यामुळे जेवणाच्या प्रसादाच्या थाळ्यांमध्ये जर मोठा भ्रष्टाचार झाला असेल तर दोषीं पर्यंत चौकशी समिती पोहोचणार काय हे सांगणे कठीण आहे.






Post a Comment

0 Comments