धस - मुंडे गुप्त भेटीचे गौड बंगाल
धसां विरोधात नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हृदयद्रावक हत्याकांड्यानंतर माजी मंत्री, भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोपांची राळ उठवली होती मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये जात त्यांनी मोर्चाच्या माध्यमातून अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या वर अनेक गंभीर आरोप केले होते. यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना त्याच वेळी धस यांनी मुंडे यांची गुप्त भेट घेतल्याची बातमी व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर उजेडात आली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत असून सोशल मीडियामध्ये यावरून नेटकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यातच भाजपचे बडे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीची जाहीर पुष्टी केली आहे. तब्बल चार तास धस आणि मुंडे यांच्यामध्ये बानकुळे यांच्या मध्यस्थीने बैठक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोघांमध्ये मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. ही बैठक बावनकुळे यांच्या मंत्र्यालयासमोरील बंगल्यावर झाल्याचे ते सांगत आहेत. तर धस यांनी ही बैठक नसून मुंडे यांच्या डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेल्याचे म्हटले आहे. त्यात गैर काय, असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
बावनकुळे यांचा बंगला मंत्रालयासमोर आहे. तर मुंडे यांचे शासकीय निवासस्थान हे मलबार हिल परिसरात आहे. दोन बंगल्यांमध्ये तब्बल सात ते आठ किलोमीटरचे अंतर आहे. मुंडे यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे ते सध्या आराम करत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील ते उपस्थित नव्हते. डोळ्यांवर झालेली शस्त्रक्रिया लक्षात घेता मुंडे हे बावनकुळे यांच्या बंगल्यावर या बैठकीला उपस्थित असल्याचे मान्य केले तर ही बैठक मुंडे यांच्या डोळ्यांचा ऑपरेशन पूर्वी म्हणजे आठ ते दहा दिवसांपूर्वी झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धस - मुंडेंमध्ये राजकीय मांडवली
त्यातच मुंडे यांच्या कार्यालयाने अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे म्हटले आहे. मुंडे यांचे कार्यालय, बावनकुळे आणि धस या तिघांची परस्परविरोधी विसंगती निर्माण करणारी वक्तव्य पाहता सुरेश धस हे काहीतरी लपत आहेत की काय अशी चर्चा सुरू आहे. धस यांनी टोकाचे आरोप मुंडे यांच्यावर केले असताना अचानक त्यांना मुंडे यांची भेट का घ्यावीशी वाटली, या भेटीत काही सेटलमेंट झाली काय, यामध्ये नेमक्या काय तडजोडी झाल्या, याचा तपशील समोर आलेला नाही. त्यामुळे धस - मुंडे यांच्यामध्ये बंद दाराआड अखेर मांडवली झाली असल्याचा आरोप होत आहे.
हा प्रकार किळसवाणा
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या भेटी बाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या की, मुंडे यांची धस यांनी घेतलेली भेट ही अत्यंत किळसवाणी बाब आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी देखील दस यांच्या या कृतीचा सडकून समाचार घेतला आहे. देशमुख कुटुंब यांना न मिळाल्यास सरकार पेक्षा धस याला अधिक जबाबदार असतील असे त्यांनी म्हटले आहे.
राजकारणी स्वार्थासाठी समाजाचा वापर करतात काय ?
संतोष देशमुख हत्याकांडामुळे मोठी तणावपूर्ण परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती. हजारोंच्या संख्येने अनेक ठिकाणी मोर्चे निघाले. यामध्ये नागरिकांनी, विशेषत: मराठा समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. या हजारोंच्या जमावासमोर सुरेश धस यांनी आक्रमक भाषणे करत धनंजय मुंडे यांना चांगलेच टार्गेट केले होते. मात्र आता दोघांमधील भेटीमुळे समाजामध्ये नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकारणी लोक आपल्या वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी समाजाचा वापर तर करीत नाहीत ना, अशी चर्चा पाहायला मिळत आहे. धस यांनी हा सर्व प्रकार मुंडे यांच्याबरोबर मंत्रीपदासाठी असणाऱ्या राजकीय स्पर्धेतून त्यांना मागे खेचण्यासाठी स्वतःची वर्णी लावून घेण्यासाठी तर केला नव्हता ना अशी शंका यामुळे उपस्थित होऊ लागली आहे.
यामुळे वाल्मीक कराड आणि अन्य आरोपी की जे मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होण्याच्या मार्गात अडथळा होण्याचे शक्यता आहे. तसे झाल्यास देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार काय, हा प्रश्न आहे.
राजकारण्यांच्या सातत्याने वेगात बदलणाऱ्या भूमिका पाहता समाजाने त्यांच्या मागे जाताना विचार करण्याची गरज आहे एवढे मात्र खरे.
0 Comments